हे भलते अवघड असते |
|
|
|
|
|
|
|
गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले |
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले |
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना |
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना |
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते |
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते |
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला |
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला |
|
|
|
|
|
हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते... |
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना... |
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना... |
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी... |
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते... |
|
|
|
|
|
तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी... |
वार्यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी... |
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली... |
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते... |
|
|
|
|
|
तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू... |
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू? |
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते... |
गजर्यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते... |
|
|
|
|
|
कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ... |
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ... |
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते... |
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते... |
|
|
|
|
|
परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी... |
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती... |
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले... |
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते... |
|
|
|
|
|
हे भलते अवघड असते…. |
|
|
0 comments:
Post a Comment