मराठी चारोळ्या

Pages

याचका, थांबु नको दारात

Monday, December 14, 2009

याचका, थांबु नको दारात
घननीळांची मूर्त वीज मी, नकोस जाळूं हात

कामव्यथेची सुरा प्राशुनी
नकोस झिंगूं वृथा अंगणी
जनकसुतेचा नखस्पर्शही अशक्य तुज स्वप्नांत

मी न एकटी, माझ्याभंवती
रामकीर्तिच्या भव्य आकृती
दिसल्यावांचुन तुला धाडितील देहासह नरकांत

जंबुकस्वरसें कसलें हंससी ?
टक लावुन कां ऐसा बघसी ?
रामावांचुन अन्य न कांही दिसेल या नयनांत

या सीतेची प्रीत इच्छिसी
कालकुटांतुन क्षेम वांच्छिसी
चंद्र्सूर्य कां धरूं पाहसी हतभाग्या हातांत ?

वनीं निर्जनीं मला पाहुनी
नेउं पाहसी बळें उचलुनी
प्रदीप्त ज्वाला बांधुन नेसी मूढा, कां वसनांत ?

निकषोपल निज नयनां गणसी
वर खड्गासी धार लाविसी
अंधपणासह यात आंधळ्यां, वसे तुझ्या प्राणांत

कुठें क्षुद्र तूं, कुठें रघुवर
कोठें ओहळ, कोठें सागर
विषसदृश तूं, रामचंद्र ते अमृत रे साक्षात

कुठें गरुड तो, कुठें कावळा
देवेंद्रच तो राम सांवळा
इंद्रायणीची अभिलाषा कां धरिती मर्त्य मनात ?

मज अबलेला दावुनिया बल
सरसाविसि कर जर हे दुर्बल
श्रीरामाचे बाण तुझ्यावर करितील वज्राघात

सरशि कशाला पुढती पुढती ?
पाप्या, बघ तव चरणहि अडती
चरणांइतुकी सावधानता नाहीं तव माथ्यांत

धांवा धांवा नाथ रघुवर !
गजशुंडा ये कमलकळीवर
असाल तेथुन ऐका माझा शेवटचा आकांत

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP