तोडितां फुलें मी सहज पाहिला जातां
Monday, December 14, 2009
तोडितां फुलें मी सहज पाहिला जातां
मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा
झळकती तयाच्या रत्नें श्रृंगावरती
नव मोहफुलांसम सुवर्ण अंगावरती
हे नयन भाळले त्याच्या रंगावरती
ते इंद्रचापसे पुच्छ भासलें उडतां
तो येउन गेला अनेकदा या दारीं
दिसतात उमटलीं पदचिन्हें सोनेरी
घाशिलें शिंग या रंभास्तंभावरी
तो दिसे सुवर्णी बघा देवरा, कांता
चालतो जलद-गति, मान मुरडितो मंद
डोळ्यांत कांहिसा भाव विलक्षण धुंद
लागला मृगाचा मला नाथ हो छंद
वेडीच जाहलें तृणांतरीं त्या बघतां
किती किती मृगाचे लक्षण मी त्या गणूं ?
त्या मृगास धरणें अशक्य कैसे म्हणूं ?
मजसाठिं मोडिलें आपण शांकरधनू
जा, त्वरा करा, मी पृष्ठि बांधितें भाता
कोषांत कोंडिलें अयोध्येंत जें धन
ते असेल धुंडित ’चरणां’ साठीं वन
जा आर्य, तयातें कुटिरीं या घेउन
राखील तोंवरी गेह आपुला भ्राता
सांपडे जरी तो सजीव अपुल्या हातीं
अंगिंचीं तयाच्या रत्नें होतिल ज्योति
देतील आपणां प्रकाश रानीं राती
संगती नेउं त्या परत पुरीसी जातां
जातांच पाहतिल हरिण सासवा, जावा
करितील कैकयी भरत आपुला हेवा
ठेवीन तोंवरी जपून गडें तो ठेवा
थांबला कशास्तव धनुर्धरा हो आतां ?
फेंकून बाण त्या अचुक जरी माराल
काढून भाउजी घेतिल त्याची खाल
त्या मगासनीं प्रभु, इंद्र जसे शोभाल
तो पहा, दिसे तो दूर टेकडी चढतां
0 comments:
Post a Comment