आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
Monday, December 14, 2009
आकाशाशीं जडलें नातें धरणीमातेचें
स्वयंवर झालें सीतेचे
श्रीरामांनी सहज उचलिलें धनू शंकराचें
पूर्ण जाहले जनकनृपाच्या हेतु अंतरींचे
उभे ठाकलें भाग्य सांवळें समोर दुहितेचें
मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
फुलुं लागलें फूल हळुं हळू गालीं लज्जेचें
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोंच होई
श्रीरामांनीं केले तुकडे दोन धनुष्याचे
अंधारुनिया आले डोळे, बावरले राजे
मुक्त हासतां भूमीकन्या मनोमनीं लाजे
तृप्त जाहले सचिंत लोचन क्षणांत जनकाचे
हात जोडुनी म्हणे नृपति तो विश्वामित्रासी
"आज जानकी अर्पियली मी दशरथ-पुत्रासी"
आनंदाने मिटले डोळे तृप्त मैथिलीचे
पित्राज्ञानें उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें
नीलाकाशीं जशी भरावी उषःप्रभा लाल
तसेंच भरले रामांगी मधु नूपुरस्वरताल
सभामंडपी मीलन झालें माया-ब्रम्हाचे
झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे
अंश विष्णुचा राम, धरेची दुहिता ती सीता
गंधर्वांचे सूर लागले जयगीता गातां
आकाशाशीं जडलें नातें ऐसे धरणीचें
0 comments:
Post a Comment