हीच ती रामांची स्वामिनी
Monday, December 14, 2009
हीच ती रामांची स्वामिनी
चंद्रविरहिणी जणूं रोहिणी
व्याघ्रींमाजी चुकली हरिणी
श्येन-कोटरीं फसे पक्षिणी
हिमप्रदेशीं थिजे वाहिनी
मलिन, कृशांगी तरी सुरेखा
धूमांकित कीं अग्निशलाका
शिशिरीं तरिं ही चंपकशाखा
व्रतधारिणि ही दिसे योगिनी
रुदनें नयनां येइ अंधता
उरे कपोलीं आर्द्र शुष्कता
अनिद्रिता ही चिंताक्रान्ता
मग्न सारखी पती-चिंतनीं
पंकमलिन ही दिसे पद्मजा
खचित असावी सती भूमिजा
किती दारुणा स्थिती दैवजा !
अपमानित ही वनीं मानिनी
असुन सुवर्णा, श्यामल, मलिना
अधोमुखी ही शशांक-वदना
ग्रहण-कालिंची का दिग्ललना
हताश बसली दिशा विसरुनी
संदिग्धार्था जणूं स्मृती ही
अन्यायार्जित संपत्ती ही
अमूर्त कोणी चित्रकृती ही
परजिता वा कीर्ती विपिनीं
रामवर्णिता आकृति, मुद्रा
बाहुभूषणें, प्रवाल-मुद्रा
निःसंशय ही तीच सु-भद्रा
हीच जानकी जनक नंदिनी
असेच कुंडल, वलयें असलीं
ऋष्यमुकावर होतीं पडलीं
रघुरायांनी तीं ओळखिलीं
अमृत-घटी ये यशोदायिनी
0 comments:
Post a Comment