पेरनी पेरनी
Friday, March 12, 2010
पेरनी पेरनी
आले पावसाचे वारे
बोलला व्होलगा
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे
पेरनी पेरनी
आले आभायांत ढग
ढगांत बाजंदी
ईज करे झगमग
पेरनी पेरनी
आभायांत गडगड
बरस बरस
माझ्या उरीं धडधड
पेरनी पेरनी
काढा पांभरी मोघडा
झडीन तो झडो
कव्हा बर्सोती चौघडा
पेरनी पेरनी
आला धरतीचा वास
वाढे पेरनीची
शेतकर्या, तुझी आस
पेरनी पेरनी
आतां मिरूग बी सरे
बोलेना व्होलगा
पेर्ते व्हा रे पेर्ते व्हा रे
पेरनी पेरनी
भीज भीज धर्ती माते
बीय बियान्याचे
भरून ठेवले पोते
पेरनी पेरनी
अवघ्या जगाच्या कारनीं
ढोराची चारनी
कोटी पोटाची भरनी
पेरनी पेरनी
देवा, तुझी रे करनी
दैवाची हेरनी
माझ्या जीवाची झुरनी
0 comments:
Post a Comment