मराठी चारोळ्या

Pages

व्यक्तिचित्रें-बहिणाबाईं

Friday, March 12, 2010

१.
खटल्याच्या घरामधीं
देखा माझी सग्गी सासू
सदा पोटामधीं मया
तसे डोयामधीं आंसू
हिच्या अंगामधीं देव
सभावानं देवगाय
माले सासरीं मियाली
जशी जल्मदाती माय !

२.
माझी ननद 'कासाई'
हिचा लोभ सर्व्यावरी
रूप देवानं घडलं
जशी इंदराची परी
हिचं सरील नाजुक
चंबेलीच्या फुलावानी
देली सम्रीताच्या घरीं
सोभे राजाचीज रानी !

३.
माझी जेठानी 'पानाई'
कशी मनांतली गोट
हिरीतांत शिरीहारी
तोंडामधीं हरीपाठ
बोले तोंड भरीसनी
तसं हातभरी देनं
काम आंग मोडीसनी
सैपाकांत सुगडीन
भरतार देवध्यानीं
मनीं दुजाभाव नहीं
जसे वाड्यांत सोभती
पांडुरंग रूखमाई !

४.
माझी वाहारी 'सीताई'
हिचं मोठं मन देखा
देल्हा देवानं सभाव
खडीसाखरसारखा
तस रूपबी घडलं
जशी बोरांतली आयी
आन कामामंधी बाकी
त्याले कुठे तोड नहीं
असो सासरी माहेरीं
जशी आंब्याची सावली
झिजे आवघ्याच्यासाठीं
अशी लाखांत माउली !

५.
माझी सासू 'भिवराई'
कसं गंमतीचं बोलनं !
हाशीसन आवघ्याचं
पोट गेलं फुटीसन
नांव ठेये आवघ्याले
करे सर्व्याची नक्कल
हांसवता हांसवता
शिकवते रे अक्कल !

६.
पाहीसनी उंदराले
आंगामधी भरे हींव
चिमाबोय चिंव चिंव
आला बोक्या गेला जीव !
देखीसनी बेंडकोयी
कशी झाली धांवाधांव
आतां डरांव डरांव
आला साप गेला जीव !
देखा देखा 'ठमाबाई'
मोठी बोल्याले आगीन
डोये भोकराच्यावानी
जशी पाहाते वाघीन
कव्हां हाशीखुषीमधीं
आयाबायांत रमते
येतां डोक्यामधीं राग
जशी चढेल घुमते

८.
'भीमा' साजरी वाहारी
हिनं उजयलं घर
अरे वाड्यामंधी वागे
आवघ्याशीं आदबूशीर
आला मिर्गाचा पाऊस
पडे आंगावर्‍हे ईज
पडे धर्तीवर भीमा
लागे शेवटली नीज

९.
'मांगो' बोवाजी तुमचा
लोभ पोरांसोरांवरी
घेता कव्हांबी उचली
पटकन कढ्यावरी
खांद्यावरी आडी काठी
दोन्ही हात काठीवर
वाड्यांतून जाती येती
जसे घालत पाखर

१०.
'गनपत' 'गनपत'
गांवामधी मोतीदाना
याची जबान मोलाची
इमानाले इसरेना
खर्‍यासाठी झगड्याले
याची मोठी रे हिंमत
गनपत गनपत
सर्व्या गांवामधीं पत
आवघ्यालेज लह्यना
नही कोन्हाले पारखा
सग्यसायासाठीं झिजे
झिजे चंदनासारखा.

११.
'भानादाजी' 'भानादाजी'
घरामंधी लिखनार
कर्तेसवरते मोठे
यांच्या हातीं कारभार
अरे हातीं कारभार
गोड सम्द्याशीं बोलनं
डोईवरती पगडी
वानीबाह्यनी चालनं
घरामधीं दबदबा
तसं वागनं तोलाचं
सर्वे लोक देती मान
कसं बोलनं मोलाचं
भाईरूनी येतां घरीं
तांब्याभरी पानी पेल्हे
माझी 'काशी' व्हती तान्ही
तीले घीसनी बसले
तिले ठेवलं रे खाले
छातीमधीं कय आली
अरे कोन्ह्या दुस्मानानं
मूठ दाजीले मारली !

१२.
अरे 'मारोत्या' 'मारोत्या'
तुझं मराठं घरानं
असा कसा झाला तरी
बाटिसनी मुसनूमान
पोरासोरांमधी नाचे
काठी फिरये गर्गर
फेके दगडाचा गोया
फोडे कौल डोक्यावर
आला घरदार सोडी
तुले कशाची फिकीर
तुझ्या कर्मामधीं भीक
झाला दारचा फकीर
आज मोठी एकादशी
नको करूं दारीं गिल्ला !
जाय तुझ्या तक्क्यामधीं
तठी म्हन बिसमिल्ला !

१३.
सदा अंगावर बुरा
डोकं कुंभाराचा आवा
नहीं डोक्यांत अक्कल
पन बुचुबुचु जुवा
नहीं कामांत उरक
खुळबुळते चेंगट
करे आदयआपट
आल अंगांत खेंगटं
कधी कोनाचं ऐकेना
अशी आस्तुरी हाटेल
नहीं कोणाची जरब
भरतार गह्याटेल
नहीं लुगड्याले पानी
वर्स गेले निंघीसन
जशी घरामंधी नांदे
'कुसुंब्याची' घसोटीन
कोन्ही बोल्याच्याच आंघीं
करे बोंबलाबोंबल
हिले जल्म देतां देवा
काय हाताले झुंबलं !

१४.
'धुडाबोय' 'धुडाबोय'
धुडाबोय रे केवढी
म्हनूं नका रे केवढी
भूईरिंगनी एवढी !
एका हातांत काडुक
दुज्या हातांत भाकर
डोक्यामधीं नाकतोडे
हिच्या पायाले चक्कर
हिच्या पायाले चक्कर
तोंडामधीं किरकिर
दोन्ही डोयाले झांजर
नाकामधीं तपकीर
खिजवती सम्देझनं
'धुडाबोय' कोनी 'धुडी'
हिच्या आवतीभंवती
पोराटोराच्या झुंबडी
हिले पाहीसन देवा
जीव पडे भरमांत
कसा 'धुडीले, घडतां
तुझा आंखडला हात !

१५.
आला 'मुनीर, टेसांत
कमेटींतला शिपायी
डोये वट्टारत पाहे
रस्त्यामधली सफाई
आला मुनीर शिपायी
याची खुरटेल दाढी
याच्या हातामधी छडी
आन तोंडामधीं बिडी
याची नजर चेकानी
दोन्हीं बुबुयं कुखडे ?
एक 'आव्हान्याच्याकडे'
एक 'कान्हाकाई' कडे !
आला मुनीर शिपायी
याची पाहीसन छडी
पोरं गडरीवरले
घरामधीं गेले दडी
अशी मुनीर दादाची
सर्व्यावर दहसत
हातीं घेतला झाडना
भंगी पये घाबरत
खेकसनं दमदाटी
याचं काम जातां सरी
मंग मारतो बैठक
'इठू' सोनाराच्या दारीं

१६.
आली मुक्की पिंजारीन
आली कापूस पिंज्याले
हातामधीं धुनुकनी
तोंडीं वटवट चाले
हिले येयेना बोलतां
काय मुक्याचं बोलनं ?
समजनं समजी घ्या
जसं तातीचं वाजनं !

१७.
चाले गान गात गात
'भोजा' फुटका फुटका
जातां येतां वाड्यांतून
सदा करतो वटका
मोठं बोलनं गंमती
सांगे गानं गाईसन
आवघ्याले हांसाळतो
याचं सुरूं सदा गानं !

१८.
'छोटू भय्या' छोटू भय्या'
तुझी कानटोपी लाल
दिसे चाकीवानी तोंड
तुझे थुलथुले गाल
तुझे डोये सदा लाल
त्याच्यांतून गये पानी
तुझ्या नाकाची ठेवन
भज्या- गुलगुल्याच्यावानी
पोट माथनीसारखं
वर्‍हे बोंबीच झांकन
व्होट पोपटाची चोंच
पढे तुयशीरामायन

१९.
'लालू मिय्या' 'लालू मिय्या'
गांवामधी आवलिया
सदा अंगावर बुरा
पावसयांत आंघोया
दाढीमिशाचं जंगल
अंगीं फाटकी गोदडी
हातीं भल्ली मोठी काठी
पाठी चिंध्याची गाठोडी
तुले नही घरदार
सोतामधींच मगन
बारीमास भटकतो
नही खानं नहीं पेनं !

0 comments:

Post a Comment

About This Blog

TYPE JOIN Ek_Mrugjal & send to 9870807070

tweet me

Our Blogger Templates

pAGge no.

Blog Archive

  © Blogger template On The Road by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP