साहित्यातल्या ध्रुवताऱ्याचं आज अंत्यदर्शन...(श्रद्धांजली)
Monday, March 15, 2010
ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विंदा करंदीकर यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी साहित्य सहवासमध्ये ठेवण्यात येणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव साहित्य सहवासमध्ये ठेवण्यात येईल. यानंतर त्यांच्या इच्छेनुसार देहदान करण्यात येणार आहे.
कविता, बालसाहित्य, समीक्षा, अनुवाद, अर्वाचीनीकरण अशा विविध प्रांतात हुकुमत गाजवणारे मराठी साहित्याचे महान तपस्वी विंदा करंदीकर यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून गुरुनानक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. विंदांच्या निधनानं साहित्य विश्वावर शोककळा पसरलीय. खऱ्या अर्थानं एखाद्या क्षेत्रात पोकळी निर्माण होणं म्हणजे काय असतं ते आज विंदांच्या जाण्यानं जाणवतय अशा भावपूर्ण शब्दात मान्यवरांनी विदांना श्रद्धांजली वाहिलीय. ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित विंदांच्या हस्ते पुण्याच्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार होतं. मात्र त्याआधीच विंदा आपल्यातून निघून गेल्यानं साहित्यप्रेमींनी दु:ख व्यक्त केलय. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक ठरले. त्याशिवाय कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, कोणार्क सन्मान, केशवसूत पुरस्कार तसेच विद्यापीठांच्या डी.लिटस् अशा पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. स्वेदगंगा, मृदगंध, धृपद, जातक , विरुपिका,
अष्टदर्शने हे त्यांचे विशेष गाजलेले काव्यसंग्रह आहेत. त्यातील अष्टदर्शने या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठनं सन्मानित करण्यात आलं होतं. तर राणीची बाग, एकदा काय झालं, सशाचे कान, एटू लोकांचा देश, परी गं परी, अजबखाना, सर्कसवाला, पिशीमावशी आणि तिची भुतावळ, हे बालकवितासंग्रह विशेष लोकप्रिय आहेत. विंदा करंदीकर यांच्या निधनानं साहित्य विश्वाची अपरिमित हानी झालीय
विंदांना पुण्यात होणाऱ्या ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करण्यात आल होत. २६, २७, आणि २८ मार्चला होणाऱ्या या साहित्य संमेलनाची सुरुवातच विंदांच्या कविता वाचनाने होणार होती. मात्र विंदांच्या निधनाने हे राहून गेल. रविवारी पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद् आणि साहित्य संमेलन कार्यकारी मंडळाकडून विंदाना श्रद्धांजली वाहण्यात आली. साहित्य क्षेत्रातील अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते .
0 comments:
Post a Comment